वृत्तसंस्था/ मँचेस्टर
विंडीज व इंग्लंड यांच्यातील तिसऱया व शेवटच्या कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे इंग्लंडचा मालिकाविजयही पाचव्या दिवसांपर्यंत लांबला आहे.
दिवसभर संततधार पाऊस झाल्याने दोनदा निरीक्षण केल्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ रद्द केल्याचे जाहीर केले. मंगळवारी पावसाची शक्यता नसल्याने पूर्ण दिवसाचा खेळ होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघांनी एकेक कसोटी जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली असल्याने या कसोटीला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. इंग्लंडने या सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले असून मालिकाविजय मिळविण्यासाठी त्यांना आणखी आठ गडी बाद करावयाचे आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 197 धावांत गुंडाळून त्यांनी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डाव 2 बाद 226 धावांवर घोषित करून विंडीजला 399 धावांचे आव्हान दिले. तिसऱया दिवशीअखेर विंडीजने दुसऱया डावात 2 बाद 10 धावा जमविल्या होत्या.