वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरात सध्या कोव्हिड 19 महामारीने धुमाकूळ घातला असल्याने कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपचे वेळापत्रकही कोलमडले आहे. या चॅम्पियनशिपची अंतिम लढत पुढील वर्षी होणार होती. पण कोव्हिडमुळे अडचणीत आलेल्या अनेक द्विदेशीय मालिका लांबणीवर टाकण्यात आल्या असून त्यांच्या नव्या वेळापत्रकावर चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचे भवितव्य अवलंबून असेल. कदाचित ती लांबणीवर टाकली जाऊ शकते, असे आयसीसीचे क्रिकेट ऑपरेशन्स जीएम जेफ ऍलरडाईस यांनी सांगितले.
कोव्हिड 19 महामारीमुळे आयसीसीचा फ्युचर्स टूर्स प्रोग्राम विस्कळीत झाला असून ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली आहे. यामुळे लांबणीवर टाकण्यात आलेल्या द्विदेशीय कसोटी मालिका पूर्ण करण्याची संधी सदस्य देशांना मिळाली आहे. ‘ठरलेल्या मालिका पूर्ण करण्याबाबत त्यांच्या काय योजना आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सदस्य देशांची चर्चा करीत आहोत,’ असे ऍलरडाईस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
सध्याची परिस्थिती आणि भरगच्च वेळापत्रक विचारात घेतल्यास पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर नियोजित असलेली कसोटी चॅम्पियनशिप अंतिम लढत लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे. कारण बांगलादेश, न्यूझीलंड, लंका, इंग्लंड यांना मागच्या मालिका पूर्ण करावयाच्या आहेत. यासाठी आम्ही प्रतीक्षा करणार आहोत आणि वेळापत्रक पुनर्रचनेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही ऍलरडाईस म्हणाले.