मुख्यमंत्र्यांकडून धरणे आंदोलन : यंदा विधानसभा निवडणूक
वृत्तसंस्था/ पुड्डुचेरी
पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सत्तारुढ असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर डेमोक्रेटिक अलायन्सने (एसडीए) उपराज्यपाल किरण बेदी यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासह अन्य नेत्यांनी राजनिवासानजीक धरणे आंदोलन चालविले आहे. किरण बेदी यांना पदावरून हटविण्याची मागणी मुख्यमंत्री करत आहेत.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या निदर्शनांचा रविवार हा तिसरा दिवस होता. कल्याणकारी योजना लागू करण्याप्रकरणी बेदी यांनी अडथळे आणले आहेत. निवडून आलेल्या सरकारला बेदी काम करू देत नाहीत. प्रशासनाच्या दैनंदिन कामातही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप नारायणसामी यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसह लोकसभा खासदार व्ही. वैथीलिंगम, काँग्रेस आमदार टी. जयमूर्ती, माकप, भाकप नेतेही बेदी यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राने यापूर्वीच सीआरपीएफ आणि सीआयएसफच्या जवानांना तैनात केले आहे.
बेदी यू गो, बेदी यू गो अशा घोषणांचे फलक हातात घेतलेल्या निदर्शकांनी बेदी पुड्डुचेरी सोडून जाईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा दावा केला आहे.