वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील वर्षी दिल्ली, मुंबई, बेंगळूर अशा विविध ठिकाणी पहिली सायकलिंग समिट आयोजित करणार असल्याचे भारतीय सायकलिंग फेडरेशनने (सीएफआय) मंगळवारी जाहीर केले.
मार्केटिंग फर्म कॉन्टॅर्क्टिकाशी या स्पर्धेसंदर्भात सामंजस्य करार केला असल्याचे सीएफआयने सांगितले. या सायकलिंग समिटची सुरुवात दिल्लीतील मुख्य ठिकाणावरून स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत सायकल राईडने करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यशाळा, मास्टरक्लासेस आणि नामवंत ऍथलिट्ससमवेत वार्तालाप असे कार्यक्रमही होणार आहेत. ‘कोव्हिड 19 महामारीमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला असला तरी फिटनेसचे महत्त्वही लोकांना त्यामुळे ध्यानात आले आहे. या कालावधीत सायकल शिकणाऱया नवोदितांनी मोठय़ा प्रमाणात सायकल खरेदी केल्याने त्यांची अभूतपूर्व विक्री झाल्याचे पहावयास मिळाले आहे. हा प्रवाह पुढे चालू रहावा आणि सर्व वयोगटातील लोकांमध्ये सायकलिंगचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून सायकलिंग समिट हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे,’ असे सीएफआयचे चेअरमन ओंकार सिंग म्हणाले. ते आशियाई सायकलिंग कॉन्फेडरेशनचेही सरचिटणीस आहेत.