ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच हा संपूर्ण भाग रविवारी ( दि.19) मध्यरात्रीपासून सील करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास सहाशेच्या घरात गेली आहे. तर आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 एप्रिलनंतर शहरात ठराविक उद्योगांना कामकाजात सवलती दिल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार दोन्ही महापालिका आयुक्तांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका संपूर्ण क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर संपूर्ण सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवारी (दि. 19) रात्री 12 वाजल्यापासून 27 एप्रिल 2020 पर्यंत केली जाणार आहे. 7 दिवस या कर्फ्यूची कडक अंमलबजावणी होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी 10 ते 2 या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.