ऑनलाईन टीम / पुणे :
लॉक डाऊनमध्ये पुणे शहरात दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालण्यात आलेली पी 1 व पी 2 ही बंधने आता हटवण्यात आली आहेत. त्यामुळे आता उद्यापासून सर्व दुकाने दररोज सुरू ठेवता येणार अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदरच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बिगर अत्यावश्यक वस्तुंची दुकाने पी- 1, पी -2 पद्धतीने खुली राहण्याबाबत नमूद होते.
ती अट आता रद्द करण्यात येत असून त्या ऐवजी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व रस्त्यांवरील सर्व बिगर अत्यावश्यक दुकाने आता पूर्वी निश्चित केलेल्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 7 खुली राहतील.