प्रतिनिधी/ धारबांदोडा
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील दावकोण या पूरग्रस्त गावाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तातडीची मदत म्हणून लोकांना 15 दिवसांचे रेशन धान्य पुरविण्याचे आदेशही त्यांनी सरकारी अधिकाऱयांना दिले आहेत. येत्या दोन दिवसात नुकसानीचा अहवाल मागविली जाईल व तो प्राप्त होताच आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दूधसागर नदीला आलेल्या पुरात शुक्रवारी दावकोण गावाला पूर्णपणे वेढले. शंभरहून अधिक घरांची लोकवस्ती असलेल्या या गावातील बहुतेक घरे पाण्याखाली गेली होती. येथील बहुतेक कुटुंबीयांना गावातील शाळा व अन्य सुरक्षीत जागी हलवावे लागले होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान स्थानिक आमदार व बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, उपजिल्हाधिकारी केदार नाईक, मामलेदार कौशिक देसाई, स्थानिक पंचसदस्य सुनिता गांवकर, पंचसदस्य विनायक गांवस, दाभाळ पंचायतीचे पंचसदस्य रमाकांत गांवकर, कृषी अधिकारी नागेश कोमरपंत आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकाऱयांकडून नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार झाल्यानंतर ज्या घरांची सर्वाधिक नुकसानी झालेली आहे अशा कुटुंबीयांना 1 लाखाहून अधिक व इतरांना योग्य नुकसान भरपाई देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंचसदस्य विनायक गांवस यांनी जी घरे पंचायतीमध्ये नोंद नाहीत, अशा कुटुंबीयांनाही सरकारने मदत करावी, शिवाय ज्या दहा बारा घरांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना तातडीची मदत पुरविण्याची मागणी केली.
हा मुद्दा लक्षात घेऊन नोंद नसलेल्या नुकसानग्रस्त घरांचे वीज बिल किंवा नळाचे बिल असल्यास त्यांना नक्कीच मदत केली जाईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. जी घरे धोकादायक स्थितीत आहेत किंवा ज्यांना राहण्याची अडचण आहे त्यांची वेगळी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पूरग्रस्तांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले. आपल्याला पूरग्रस्तांच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असून त्यांना वेळेत व योग्य ती मदत मिळवून देण्याचे आपले प्रयत्न आहेत. घरांची साफसफाई व नित्यवापरासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटक राज्यात चौकशी पथक पाठविणार
कुळे व मधलावाडा येथील पुलांना पुराचा तडाखा बसला असून सध्या हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. पुलांची क्षमता तपासल्यानंतर त्यावरून वाहतूक सुरु करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. दिवाळीनंतर गरज भासल्यास या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासंबंधी प्रक्रिया सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अचानकपणे आलेल्या या महापुरासंबंधी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केला, तेव्हा कर्नाटकातील सुपा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. या आपत्तीसंबंधी चौकशी करण्यासाठी गोवा सरकारचे एक पथक कर्नाटक राज्यात पाठवून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जलस्रोतमंत्री फिलीप नेरी यांनी सांगे भागातील पूरग्रस्त भागाला भेट दिली, तेव्हा मंत्री दीपक पाऊसकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान कर्नाटक राज्यात गोव्यातील काही अधिकाऱयांचे पथक पाठविण्याचे त्यांनी मान्य केले. मंत्री पाऊसकर यांनी धारबांदोडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. कुळे, शिगांव पंचायत क्षेत्रात सुमारे 130 घरांमध्ये पाणी घुसल्याचे उघड झाले आहे. मोले येथे एका घरांमध्ये तर साकोर्डा पंचायत क्षेत्रात अंदाजे 19 घरांना पुराचा फटका बसला. धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील दावकोण गावात 69, आंबे धुलैय गावात 4 तर मरड येथे 3 घरांमध्ये पाणी घुसून नुकसानी झाली आहे.
दिगंबर कामत यांच्याकडून कडधान्याचे वाटप
दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी सायंकाळी दावकोण येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. सरकारने पूरग्रस्तांना आधी तातडीची मदत पुरवावी व नंतर कायदेशीर प्रक्रिया नंतर पूर्ण करावी. पूरग्रस्तांची अत्यंत वाईट परिस्थिती असून त्यांना योग्य मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे कामत यांनी सांगितले. यावेळी सुमारे 80 लोकांना कडधान्य वितरीत करण्यात आले. त्यांनतर शिगाव भागाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली व कडधान्य वितरीत केले. यावेळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी व इतर कार्यकर्ते उपस्थित हेते.