वार्ताहर / पुलाची शिरोली
एस .टी . बसने टेम्पो व मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. रीना विजय समुद्रे ( वय ३४, रा. किणी, ता. हातकणंगले ), सुनील तुकाराम समुद्रे ( ६५, रा. किणी, ता. हातकणंगले ), नेताजी विश्वास नलवडे (६२, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर ) व बाबासो सर्जेराव हिरवे ( ३०, रा. पैजारवाडी, ता. पन्हाळा ) अशी जखमींची नावे आहेत. पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली फाटा येथे दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे कोल्हापूरच्या दिशेने होणारी महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , कोल्हापूरला जाणारी एस टी बस पुलाची शिरोली फाटा येथे मोटारसायकलीस ओव्हर टेक करताना महामार्गावर पंक्चर होवून थांबलेल्या मालवाहू टेम्पोस धडकली. या धडकेमुळे थांबलेला मालवाहू टेम्पो काटकोनात वळला व मोटारसायकलीस धडकून दुभाजकावर चढला. यामुळे मोटारसायकलस्वार व एसटी बसमधील तीन प्रवासी असे चौघे जखमी झाले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे महामार्गावरील एकेरी वाहतूक काही काळ ठप्प होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. तर याबाबतची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.