पुसेगाव / वार्ताहर :
खटाव तालुक्यातील जवळपास 50 गावात मागील 14 दिवसापासून सुरु असलेला प्रतिबंधात्मक क्षेत्र निकष पूर्ण झाला आहे. या ठिकाणचे निर्बंध शिथिल करून पुसेगावसह इतर ठिकाणी काही व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र, दि 20 जून पर्यंत पुसेगावतील सर्वच व्यापारी व दुकानदारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा सोमवार दि 21 पासून व्यापाऱ्यांना आपली दुकाने उघडता येणार नाहीत.
गेल्या दीड महिन्यांपासून पुसेगावसह इतर भागातील नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यातच प्रांताधिकाऱ्यांनी 31 मे च्या दरम्यान पुसेगाव हे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केल्याने पुन्हा 14 दिवस जनतेने लॉक डाऊन पाळला. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतीशी निगडित दुकाने, भाजीपाला व फळविक्रीते, किराणा दुकाने, बँका सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत सुरू आहेत. यात हार्डवेअर दुकानांना सवलत देणे गरजेचे असताना बंद राहिल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.