मुख्यमंत्री सावंत यांची माहिती , रेल्वे खात्याशी चर्चा सुरू
प्रतिनिधी/ पणजी
राज्याच्या हितासाठी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प तडीस नेले असून, राज्यातील प्रत्येक जनतेला उत्तम सुविधा निर्माण करून देण्याबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावणे हा सरकारचा प्रमुख हेतू आहे. सरकारच्या सोयी-सुविधांपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोपा विमानतळ तसेच दक्षिण गोव्याला जोडण्यासाठी पेडणे ते काणकोण या दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिली.
मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेंतर्गत शिर्डी जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्याच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ घेता यावा यासाठी दक्षिण गोव्याला जोडण्यासाठी पेडणे ते काणकोण या ठिकाणी रेल्वेच्या विशेष गाड्यांचा सरकार विचार करीत आहे. सरकारने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दक्षिण गोवा दरम्यान अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी पेडणे ते काणकोण या ठिकाणी अतिरिक्त रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वेशी संपर्क साधला आहे. पेडणे ते काणकोण या ठिकाणी रेल्वे मार्ग झाल्यास यासाठी केवळ 45 मिनिटे लागतील. यामुळे यामुळे पर्यटकांना तसेच स्थानिकांनाही त्याचा लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
देवदर्शन यात्रेत नवीन ठिकाणे येणार
तिऊपती, वालंकनी आणि शिर्डी या व्यतिरिक्त आता मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेत वाराणसी, काशी आणि अयोध्या ही नवीन ठिकाणे समाविष्ट केली जातील, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. राज्यातील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठीही अशीच योजना सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
अल्पभूधारक कुटुंबांना लवकरच 3 मोफत सिलिंडर
भाजप सरकारने निवडणुकीतील सर्व आश्वासने पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आता यापुढे अल्पभूधारक कुटुंबांना लवकरच 3 मोफत सिलिंडर दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.