कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे बैठकीत निर्णय : शक्य झाल्यास पावसाळ्य़ातही होऊ शकते संमेलन
प्रतिनिधी / पणजी
गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे पेडणे येथे आयोजित केलेल्या 28 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली होती, मात्र वाढते कोरोना रुग्ण व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शक्य झाल्यास हे संमेलन पावसाळ्य़ातही घेण्यात येईल, अशी शक्यता यावेळी वर्तविण्यात आली.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाने पेडणे येथे 8 व 9 मे असे दोन दिवस आयोजित करण्यात आले होते. नुकत्याच गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठक अध्यक्ष रमेश वंसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल गावस, कार्यवाह सुहास बेळेकर, चित्रा क्षीरसागर, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजमोहन शेटये, कार्यक्रम समितीचे दयाराम पाडलोस्कर, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, हेमंत खांडेपारकर व कार्यक्रम समितीचे सदस्य उपस्थित होते.
या संमेलनात सहभाग घेणाऱया सर्व साहित्यिकांना भ्रमणध्वनीवरुन या संबंधिची माहिती दिली जाणार आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक संत तुकारामाचे आठवे वंशज डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत होणार होती. त्यांनाही खबर देण्याचे ठरवले. तसेच संमेलनाचे काम चालूच ठेवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
संमेलनातील साहित्यिक कार्यक्रम, कविसंमेलन, कविकट्टा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संमेलनात प्रकाशित करायच्या पुस्तक वा स्मरणिकेचे काम पुर्णत्वास आलेले आहे. सत्कार मूर्ती, गौरव मूर्ती, पाहुण्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे मात्र कोरोनामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात येत असून कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यावर व स्थिती सामान्य झाल्यावर पावसाळ्य़ात मंडप न घालता एका मोठय़ा सभागृहात हे संमेलन भरवण्याचा निर्णय गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.