पोलिसांच्या पार्किंगमध्येच चोरी करण्याचे धाडस
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या काही दिवसांपासून जिल्हय़ात दुचाकी चोरटय़ांचे प्रस्थ चांगलेच वाढले आहे. सातारा शहर व परिसरात तर दरदिवशी एक, दोन दुचाकी चोऱयाच्या घटना घडतच असतात. आता चोरटय़ांनी पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगला सुध्दा लक्ष्य केले असून तेथूनच एक दुचाकी चोरुन दुचाकी चोरटय़ांने पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. अनिल तात्याबा चव्हाण (वय 50 रा. वेळेकामथी, ता. सातारा) हे दि. 20 रोजी कामानिमित्त मल्हारपेठेतील पोलीस मुख्यालयात आले होते. त्यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा दुचाकी (क्रमांक एम. एच. 11 ए. जे. 0207) ही पोलीस मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती.
ही दुचाकी अज्ञात चोरटय़ाने लंपास केली. याबाबत त्यांनी शोधाशोध केल्यानंतर दि. 23 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या दुचाकी चोरीचा तपास पोलीस नाईक पवार करत आहेत. दरम्यान, पोलीस मुख्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही असून देखील चोरटय़ाने पोलिसांच्या पार्किंगमध्ये दुचाकी चोरण्याचे धाडस केले आहे. त्याबरोबरच सातारा शहरातील गर्दीच्या ठिकाणी असो व अपार्टमेंटमधील पार्किंग असो दुचाकी चोरटय़ांनी नागरिकांना चांगलेच हैराण केलेले आहे.