पोलीसही रंगलेत गणरायाच्या भक्तीत
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरातील पोलीस स्थानकांत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अधिकारी भक्तीभावाने गणेशपूजनात मग्न आहेत. दरवषी प्रत्येक पोलीस स्थानकात मोठा उत्साह असायचा. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर थाटमाटाला फाटा देऊन साध्या पद्धतीने पोलीस स्थानकात गणरायाचे आगमन झाले आहे.
दरवषी गणेश प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक पोलीस स्थानकात सत्यनारायणाची पूजाही घातली जात होती. पूजेनंतर 500 ते 1000 भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात होते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाप्रसादाला फाटा देण्यात आला असला तरी गणरायाच्या भक्तीत मात्र कसलीच कमी झाली नाही.
दसरा, दिवाळी असो किंवा गणेशोत्सव असो. पोलिसांना बंदोबस्ताच्या कामावर सतत सतर्क रहावे लागते. गणेशोत्सवात तर घरचा गणपती आणायलाही वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती असते. काहीवेळा कुटुंबातील इतर सदस्य श्रीमूर्ती आणून प्रतिष्ठापना करतात. म्हणून पोलिसांनाही गणेशोत्सवात सहभागी होता यावे यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात उत्सव साजरा केला जातो.
अधिकारी व पोलीस भेदभाव विसरून गणरायाच्या भक्तीत रंगतात. अधिकारी श्रीमूर्ती आणून प्रतिष्ठापना करतात तर महिला पोलीस व महिला अधिकारी आरती करून त्याचे स्वागत करतात. बहुतेक पोलीस स्थानकात पाच दिवस गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. कारण, पाचव्या दिवसानंतर बंदोबस्ताचा ताण वाढतो. म्हणून पोलीस स्थानकातील गणेशोत्सव पाच दिवसच साजरा केला जातो.
अलीकडेच येथील मार्केट पोलीस स्थानकात रुजू झालेले पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी, एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ आदी अधिकाऱयांसाठी हा गणेशोत्सव पहिलाच आहे. प्रत्येक पोलीस स्थानकात गणेशोत्सवासाठी अधिकारी व कर्मचाऱयांनी पारंपरिक वेशभूषाही केली होती. या काळात वरिष्ट अधिकारी पोलीस स्थानकात येऊन दर्शन घेतात. कोरोनामुळे नेहमीचा थाट नसला तरी पोलीस स्थानकात सध्या भक्तीमय वातावरण दिसू लागले आहे.