‘आयआरसीटीसी’च्या योजनेला आज उत्तर प्रदेशमधून प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रवाशांची सोय आणि गरज लक्षात घेऊन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) आता पोस्ट कार्यालयांमध्ये रेल्वेचे तिकीट उपलब्ध करण्याची योजना सुरू करत आहे. आता रेल्वेप्रवासी जवळच्या पोस्ट ऑफिसमधून टेनचे तिकीट बुक करू शकतील. या सुविधेमुळे रेल्वेस्थानकांच्या तिकीट काउंटरवरील गर्दी कमी होऊ शकते. रेल्वे आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव 6 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील 9,147 पोस्ट ऑफिसमधून रेल्वे आरक्षण तिकीट देण्याची योजना सुरू करणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर 6 जानेवारीपासून या भागातील ग्रामीण डाक सेवकही प्रवाशांसाठी रेल्वेचे आरक्षण तिकीट उपलब्ध करून देऊ शकतील. ‘आयआरसीटीसी’च्या सहकार्याने रेल्वे तिकीट बुक करण्याची प्रणाली लागू केली जाईल. या योजनेच्या उद्घाटनाबरोबरच रेल्वेमंत्री गोमतीनगर स्थानकावरून नवीन टेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याशिवाय गाडय़ांच्या दुरुस्तीसाठी वॉशिंग पिट लाईनचे उद्घाटनही करणार आहेत.