सुळगा-हिंडलगा येथील घटना : परिसरात हळहळ व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
सुळगा-हिंडलगा येथील सीमीदेवीनगर जवळ असलेल्या खाणीमध्ये पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून शाळकरी मुलाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुमार अशोक कांबळे (वय 15, रा. आंबेडकर गल्ली, सुळगा-हिं.) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. खडीमशिनच्या खाणीमध्ये सोमवारी दुपारी तो पोहायला गेला होता. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार कुमारला पोहता येत नव्हते. गावातील काही इतर मुलेही खाणीत पोहत होते. त्यावेळी पाण्यात उतरलेल्या कुमारचा बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस., उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी एचईआरएफ टीमला पाचारण करण्यात आले. टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, विशाल हंडे, राजू टक्केकर, अभिषेक येळ्ळूरकर, वैभव पाटील, पद्मप्रसाद हुली, भावेश्वर जोगणी आदींनी गावकऱयांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुमारची आई वैशाली अशोक कांबळे यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.