नविआच्या या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा
प्रतिनिधी/ सातारा
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक नेते ऍड.प्रकाश आंबेडकर हे सडेतोड बोलणारे म्हणून देशभर परिचित आहेत. मागे नगरपालिका निवडणुकीवेळी ही त्यांनी गुरुवार परजावर जाहीर सभा घेऊन खासदार उदयनराजे यांच्यावर तोंडसुख घेतले होते.आताही त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर थेट खासदार उदयनराजे यांच्यावर वक्तव्य करून राळ उडवुन दिली आहे.त्यांच्या वक्तव्याने खासदार उदयनराजे प्रेमी रस्त्यावर उतरल्याचे दिसले परंतु त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीचे कार्यकर्ते कुठेही निषेध करताना दिसले नाहीत. एकही पत्रक काढले नाही.त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य म्हणजेच थेट शब्द जखम करून जातात.अशीच जखम त्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे येथे पत्रकार परिषदेत केली.खासदार उदयनराजे यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.निषेध केला.प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हे दाखल होऊ लागले.पण असे वातावरण तापलेले असताना सातारा नगरपालिकेत असलेल्या त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीचे कोणीही नगरसेवक निषेध करताना दिसले नाही वा कसलेही पत्रक काढल्याचे दिसले नाही.
आमदार शिवेंद्रसिंहराजे हे भाजपचे आमदार असले तरीही त्यांचे कार्यकर्ते हे अजूनही इतर पक्षाचे आहेत.नगरपालिकेत तर त्यांच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक आहेत.त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी का चुप्पी साधली,का निषेध केला नाही याचीच चर्चा सुरू आहे.
मराठा आरक्षणाबाबत ही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी वारंवार स्वतःची भूमिका स्पष्ट केली असली तरीही नगरविकास आघाडीचे अमोल मोहिते, अविनाश कदम, माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण वगळता कोणीही आपली भूमिका मांडताना दिसत नाही.त्याबाबत ही उलटसुलट चर्चा सुरू आहे.