कणकवली विभागात 517 अर्जधारक : नवीन अर्जही ऑनलाईन पद्धतीने घेण्यास सुरू
प्रतिनिधी / कणकवली:
कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 नुसार कृषीपंप जोडणीसाठी निर्धारित नियम व अटींच्या आधारे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. एप्रिल 2018 नंतर पैसे भरलेल्यांसाठीची कार्यवाही सुरू करण्यात येत असून आता या धोरणांतर्गत नवीन अर्जही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. तसेच एप्रिल 2018 पूर्वीच्या अर्जधारकांनाही एचव्हीडीएस अंतर्गत जोडणी सुरू करण्यात आली आहे. कणकवली विभागात असे 517 अर्जधारक असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 नुसार एलटीलाईनवरून 30 मीटरपर्यंत अंतर असलेल्या ग्राहकाला लोड शिल्लक असल्यास एक महिन्यात जोडणी देण्यात येणार आहे. तसेच एलटीलाईनपासून 200 मीटरच्या आत अंतर असलेल्या व पर्याप्त लोड शिल्लक असलेल्या ग्राहकाला तीन महिन्यांच्या आत एरियल बंच केबलच्या माध्यमातून जोडणी देण्यात येणार आहे. मात्र, यासाठीचा खर्च अर्जदारास करायचा असून त्याचा परतावा ग्राहकाला वीजबिलातून देण्यात येणार आहे. तसेच अर्जदाराची आर्थिक कुवत नसल्यास प्राधान्यक्रमानुसार कनेक्शन देण्यात येणार आहे.
200 मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्यांसाठीही यात समावेश असून 600 मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर उर्जेवर वीजजोडणी देण्यात येणार आहे. 600 मीटरपर्यंतसाठीही एचव्हीडीएसमधून पर्याय असणार असून यासाठी दोन ग्राहकांपर्यंत एक ट्रान्सफॉर्मरची सुविधा देण्यात येणार आहे. यात 600 मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्यांनाही योजनेचा लाभ मिळेल. परंतु बिलपरताव्यातील सुट ही 600 मीटरपर्यंतसाठीच मिळणार आहे. तसेच आर्थिक क्षमता नसलेल्यांसाठीही प्राधान्यक्रमानुसार कार्यवाही होणार आहे. तसेच आजी, माजी सैनिक, एससी, एसटी घटकांसाठी प्राधान्यक्रमाने जोडणी देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांकडून सामाजिक बंधपत्र करून घेण्यात येणार आहे. तसेच पंपाला कॅपॅसिटर बसविणे आवश्यक आहे. यात ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यास 80 टक्के पंपाना कॅपॅसिटर बसविलेला व 80 टक्के ग्राहकांनी वीज बिलभरणा केलेले असणे आवश्यक असून तरच ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत नवीन जोडणीसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करायचा आहे. यात सिंगल फेज, लघुदाब, उच्चदाब वाहिनीवरून कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मोहिते यांनी दिली. कणकवली विभागातील देवगड, वैभववाडी, मालवण व कणकवली तालुक्यात मिळून 517 कृषी कनेक्शन ही एप्रिल 2018 पूर्वीची जोडणी करायची आहेत. यासाठीची कंपनी उपलब्ध झालेली असून वैभववाडी तालुक्यात काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच देवगड व इतर तालुक्यात काम सुरू होईल. ही कनेक्शन एचव्हीडीएसअंतर्गत असून टप्प्याटप्प्याने जोडणीचे काम करण्यात येत असल्याचे मोहिते यांनी सांगितले.