तातडीने नियोजन करा, पालकमंत्र्यांच्या सूचना : कोविड सद्यस्थितीचा घेतला आढावा
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ातील सव्वादोन लाख घरांमध्ये सॅनिटायझर वितरण आणि सुमारे आठ लाख जनतेला प्रत्येकी दोन मास्कचे वितरण करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम व जिल्हय़ातील कोविड-19 ची सद्यस्थिती यांचा आढावा पालकमंत्री सामंत यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील उपस्थित होते.
दुसऱया लाटेची शक्यता
तज्ञांच्या सल्ल्यानुसार कोविड-19 ची दुसरी लाट येण्याची शक्मयता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हय़ातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वितरण करायचे असल्याचे सांगून सामंत पुढे म्हणाले की, जिल्हय़ातील प्रत्येक नागरिकाला दोन मास्कचे वितरण करायचे आहे. यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करून जिल्हाधिकाऱयांच्या मान्यतेने कार्यवाही सुरू करावी. प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच लोकांच्या आरोग्याचा विचार करून ही कार्यवाही लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱयांनी काम करावे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हय़ात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. ‘कोरोना’वर संपूर्ण नियंत्रण मिळविणे, मृत्यूदर आणखी घटविणे, पॉझिटिव्हीटी दर कमी करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.