नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी दरवाढीबाबत सुतोवाच केले आहे.
कंपनीच्या निर्मितीअंतर्गत खर्चामध्ये वाढ झाली असल्या कारणाने याचा भार आता ग्राहकांनाही झेलावा लागणार आहे. कारण कंपनी प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. प्रवासी वाहनांच्या किंमती पुढील आठवडय़ापासून वाढविण्याची शक्यता कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे. स्टीलसह इतर कच्च्या मालाच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. कंपनीच्या टीयागो, नेक्सॉन, हॅरीयर आणि सफारी या वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. किंमती किती वाढणार आहेत याबाबत मात्र कंपनीने स्पष्ट केलेले नसले तरी वाढ फारशी नसणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.