युरी आलेमावची नगरनियोजन खात्यावर टीका
प्रतिनिधी /मडगाव
आज प्रशासनातील अधिकारी हे सत्तेत असलेल्या राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांच्या मर्जीनुसार पर्यावरण विरोधी, गोवा विरोधी व बेकायदेशीर व भ्रष्ट कामे करण्यात गुंतले आहेत. एकेकाळी सरकारी अधिकारी केवळ सत्तेत असलेल्यांसमोर वाकत होते. नगरनियोजन खात्यातील अधिकाऱयाने पांजरकोणी कुंकळ्ळी येथील कांकणामोड्डी हा डोंगरच नव्हे असे वक्तव्य करुन आज सरकारी अधिकारी सत्तेत असलेल्यांसमोर लोटांगण घालत असल्याचे उघड केले आहे अशी बोचरी टीका काँग्रेस नेते युरी आलेमाव यांनी केली.
कांकणामोड्डी येथील बेकायदा डोंगरकापणीवरुन उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीवर त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेवुन भाजप सरकारवर टीका केली. यावेळी सदर बेकायदा डोंगर कापणीविरुद्ध तक्रार दाखल केलेले विजय प्रभू, विश्वास देसाई व व्हिक्टर तावारीस हजर होते.
आज काकणामोड्डीच नव्हे तर गोव्यात अनेक ठिकाणी अशीच डोंगर कापणी व बेकायदा जमीन रुपांतरांची प्रकरणे भाजप सरकारचे मंत्री व आमदारांच्या आशीवार्दाने सुरू आहेत. कुंकळ्ळी मतदारसंघात स्थानिक आमदार तथा मुरगाव विकास प्राधिकरणाचे अध्यक्षांच्या सहभागाने शेकडो कोटी रुपयांचे जमीन रुपांतरांचे व्यवहार घडत आहेत. केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी स्थानिक आमदार क्लाफास डायस आज पर्यावरणाचा नाश करुन भ्रष्टाचार करण्यात गुंतले असल्याचा आरोप यावेळी युरी आलेमाव यांनी केला.
कुंकळ्ळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱयावर राजकीय दबाव टाकून स्थानिक आमदार व मंत्री त्यांच्याकडून बेकायदा कामे करुन घेत आहेत. कुंकळ्ळी पालिकेचे मुख्याधिकारी सप्टेंबरात निवृत्त होणार असून त्यांचा पुरेपूर वापर विद्यमान आमदार व मंत्री करुन घेत आहेत असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
आज कुंकळळीचे आमदार क्लाफास डायस हे या एकंदर बेकायदा डोंगर कापणीवर तोंड बंद करुन आहेत. यावरुनच सरकारची नगर विकास खात्यापासून पालिका मुख्याधिकारी असे सर्वचजण या बेकायदा प्रकरणांत गुंतल्याचे उघड होत आहे. सरकारने या एकंदर प्रकरणाची दक्षता खात्यातर्फे चौकशी करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.