आयटीआर, टीडीएस/टीसीएससाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. प्राप्तिकरदात्यांना आता 30 नोव्हेंबरपर्यंत आयटीआर दाखल करता येणार आहे. यापूर्वी 2019-20 आर्थिक वर्षासाठी टीडीएस/टीसीएस स्टेटमेंट्स जमा करण्याची मुदतही वाढवून 31 जुलै करण्यात आली होती.
2019-20 आर्थिक वर्षासाठी गुंतवणूक आणि क्लेम डिडक्शनची मुदतही एक महिन्याने वाढवून 31 जुलै करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने नवा आयटीआर अर्जही सादर केला आहे. सीबीडीटीने 2019-20 आर्थिक वर्ष (असेसमेंट ईयर 2020-21) साठी विवरणपत्रात दुरुस्ती केली आहे.
प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी अलिकडेच मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यात विभागाने करदात्यांना पर्सनल ई-फायलिंग खात्याच्या हॅकिंगसंबंधी सतर्क राहण्यास सांगितले आहे. कुठल्याही प्रकारची गडबड दिसून आल्यास त्याची माहिती सायबर सुरक्षा विभागाला देण्यास सांगण्यात आले आहे.