‘कलम 370’साठी चीनची मदत घेण्याची तयारी
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी ‘कलम 370’ वरून देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. काश्मीर खोऱयात पुन्हा हे कलम लागू होईल अशी आशा व्यक्त करत यासाठी प्रसंगी चीनची मदतही होऊ शकते, असे भाष्य अब्दुल्ला यांनी केले आहे. तसेच जम्मू-काश्मीर खोऱयात कलम 370 आणि कलम 35 अ पुन्हा लागू करण्यासाठी व जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत नोंदवल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका होऊ लागली आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करून वर्ष झाले आहे. संविधानिक मार्गाने संसदेच्या दोन्ही सदनात याचा निर्णय झाला असला तरीही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट, 2019 पूर्वीची स्थिती लागू करावी, अशी मागणी केली होती. काश्मीर खोऱयातील स्थिती सुधारलेली नाही. संपूर्ण देशात लोक 4-जी सेवा वापरत आहेत. तसेच आता 5-जी सेवाही येत आहे. मात्र खोऱयात लोक अजूनही 2-जी सेवा वापरत आहेत. त्यामुळे येथील तरुण प्रगती कसे करतील? देशात इतर नागरिकांना ज्या सेवा मिळतात त्या येथील नागरिकांना का मिळत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.