प्रतिनिधी /मडगाव
भाजप सरकारातील मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रोड्रिग्स हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. काल रविवारी रात्री त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक वेळळीत झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. फिलीप नेरी रोड्रिग्स यांच्यासाठी एकमेव राजकीय पक्ष शिल्लक होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व याच पक्षा तर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांच्या समर्थकांनी घेतला आहे.
फिलीप नेरी रोड्रिग्स हे आज सोमवारी भाजपला सोडचिठ्ठी देणार असून मंत्री पदाचा राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
फिलीप नेरी रोड्रिग्स यांनी काल आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी काही समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशा भावना व्यक्त केल्या तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे निवडणूक लढवावी अशी विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांच्यात साम्य आहे. त्याच प्रमाणे, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि शिवसेना यांचे युतीचे सरकार आहे. त्यामुळे वेळळीतील मतदार राष्ट्रवादीला स्वीकारतील अशी प्रतिक्रीया यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
वेळळी मतदारसंघात सद्या तृणमूल काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या दरम्यान भांडणे सुरू झालेली आहे. येथील नेते एकमेकांवर आरोप करीत आहेत. फिलीप नेरी रोड्रिग्स हे अशा गोष्टीपासून दूर राहिले असून वेळळीतील मतदारांकडे त्यांचा चांगला संपर्क असल्याने तेच पुन्हा विजयी होतील असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला.