वृत्त संस्था/ जिनिव्हा
स्वीसचा ज्येष्ठ, अनुभवी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररला पुढील वर्षीच्या जून-जुलै दरम्यान लंडनमध्ये होणारी विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा हुकण्याची शक्यता आहे.
रॉजर फेडररला अलीकडे गुडघ्याला झालेल्या दुखापतीने वारंवार सतावले आहे. दुखापत झालेल्या गुडघ्यावर तीनवेळा शस्त्रक्रियाही झाली आहे. मात्र, 40 वर्षीय फेडरर अद्याप या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. 2022 विम्बल्डन स्पर्धेला 27 जूनपासून प्रारंभ होत आहे. या दुखापतीमुळे फेडररला गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत टेनिसपासून अलिप्त रहावे लागले. येत्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा खेळविली जाणार असून या स्पर्धेत आपण खेळू शकणार नाही, असे फेडररने बुधवारी स्वीस प्रसार माध्यमाशी दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
फेडररने आपल्या टेनिस कारकीर्दीत विक्रमी 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून सर्बियाचा टॉप सीडेड जोकोविच तसेच स्पेनचा राफेल नदाल यांनीही आतापर्यंत प्रत्येकी 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे पटकाविली आहेत.