हिवाळय़ापूर्वी वैज्ञानिकांचा इशारा : इंग्लंडमध्ये जानेवारी-एप्रिलदरम्यान 58 प्रकरणांची नोंद
वैज्ञानिकांनी आगामी हिवाळय़ासंबंधी इशारा दिला आहे. त्यांच्यानुसार कोरोना आणि फ्ल्यू एकाचवेळी झाल्यास मृत्यूचा धोका दुप्पट होऊ शकतो. 20 जानेवारी ते 25 एप्रिलदरम्यान इंग्लंडमध्ये अशी 58 प्रकरणांची नोंद झाली आहे. हे रुग्ण फ्ल्यू आणि कोविड-19 या दोन्हींना तोंड देत होते. त्यांच्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 27 टक्के होता. तर फ्ल्यूमुळे 43 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
फ्ल्यूचे संक्रमण बहुतांशी हिवाळय़ातच होते. कोविड-19 संबंधी तो हंगामी आजार असल्याचे म्हणणे सद्यस्थितीत अवघड आहे. दोघांचीही लक्षणे साधर्म्य दर्शविणारी आहेत. अशा स्थितीत चाचणीशिवाय दोघांमधील अंतर शोधून काढणे अवघड आहे. याचमुळे हिवाळय़ात आणखीनच सावध राहण्याची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
…तर रुग्ण वाढणार
हिवाळय़ात फ्ल्यूपासून स्वतःला न वाचविल्यास रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढणार आहे. संबंधित व्यक्ती कोविड-19 चा रुग्ण आहे का फ्ल्यूला तोंड देतोय हे निश्चित करणे अवघड ठरणार आहे. फ्ल्यूच्या विषाणूचा संसर्ग खोकणे आणि शिंकल्याने फैलावतो आणि कोविड-19 मध्येही असेच घडते. फ्ल्यूचा रुग्ण सुमारे 1 आठवडय़ात बरा होतो. परंतु कोरोनाचा रुग्ण बरा होण्यास दीर्घ कालावधी लागत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
आयसोलेशन सर्वात महत्त्वाचे
हे संशोधन अत्यंत लहान असले तरीही हिवाळय़ात यावर पुढील संशोधन होणार आहे. फ्ल्यू आणि अन्य रेस्पिरट्री विषाणू हिवाळय़ात संक्रमण फैलावतात. याचमुळे फ्ल्यू किंवा कोविड-19 ला तोंड देत असल्यास स्वतःला घरात आयसोलेट करा. अशाप्रकारे स्वतःही सुरक्षित रहाल आणि इतरांनाही सुरक्षित ठेवू शकाल असे उद्गार इंग्लंडचे उपप्रमुख वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक जोनाथन वेन-टेम यांनी काढले आहेत.