प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या विजय गवाणे या युवकाच्या पत्नीने रविवारी पोलीस अधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. आपल्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बंडू केरवाडकरला त्वरित अटक करा, अशी मागणी मेघना गवाणे यांनी केली आहे.
रविवारी बापट गल्ली येथील महिलांनी खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. बंडू केरवाडकरने दिलेल्या सततच्या जाचामुळे मानसिक त्रास होऊन आपले पती विजय मनोहर गवाणे (वय 35) यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मेघना यांनी केला असून फरारी बंडू केरवाडकरला त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विजय गवाणे या युवकाने आपण काम करीत असलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात बंडू केरवाडकरविरुद्ध खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून बंडू फरारी झाला आहे.
बापट गल्ली येथील महिलांनी बंडू केरवाडकर कशा पद्धतीने छळत होता, यासंबंधीची माहिती पोलीस अधिकाऱयांना दिली आहे. 10 टक्के व्याजाने तो कर्ज देतो. घेतलेल्या रकमेपेक्षा अनेक पटीने परतावा देऊनही त्याचे धमकावण्याचे सत्र सुरूच असते. त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी मेघना यांनी केली आहे.
शिनोळीत तपास
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून बंडू फरारी आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने आपला मोबाईलही बंद ठेवला आहे. शिनोळी परिसरात खडेबाजार पोलिसांनी शनिवारी रात्री बंडूसाठी शोध घेतला. चंदगड, गडहिंग्लज तालुक्मयात त्याचा शोध घेण्यात येत आहे.