ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बांदीपोरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे हाती आले आहेत. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबासाठी काम करणारा एक पाकिस्तानी दहशतवादी सामील होता. सीसीटीव्ही फुटेजवरुन या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. दरम्यान, बंदीपोरात काही ठिकाणांहून घुसखोरीची भीती असून संशयास्पद कारवायांवर सतत लक्ष ठेवले जात आहे, असे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी आज लष्कर, सीआरपीएफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेतली. त्यात खोऱ्याच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, बांदीपोरा दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी ठार झाले होते. या हल्ल्यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावरील सीसीटिव्हीजच्या फुटेजवरुन अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
आयजी विजय कुमार आणि लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग संजीवसिंग सलारिया यांनी बांदीपोरा येथे सुरक्षा अधिकाऱयांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषविले.