न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी -जलद गोलंदाज टीम साऊदीचे 43 धावात 6 बळी
लंडन / वृत्तसंस्था
सलामीवीर रोरी बर्न्सने 132 धावांची दमदार खेळी साकारल्यानंतरही इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या डावात सर्वबाद 275 धावांवर समाधान मानावे लागले. इंग्लंडचा डाव संपुष्टात आल्यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात चहापानाची घोषणा केली गेली. न्यूझीलंडतर्फे जलद गोलंदाज टीम साऊदीने अवघ्या 43 धावात 6 फलंदाजांना बाद केले. किवीज संघ या लढतीत पहिल्या डावाअखेर 103 धावांनी आघाडीवर राहिला.
या लढतीत शुक्रवारी तिसऱया दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे अगदी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर शनिवारी चौथ्या दिवशी इंग्लंडने 2 बाद 111 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली. मात्र, त्यांच्या उर्वरित 8 फलंदाजांना केवळ 164 धावांची भर घालता आली. त्यात रोरी बर्न्सचे दमदार शतक लक्षवेधी ठरले. बर्न्सने 477 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 16 चौकार व 1 षटकारासह 132 धावांचे योगदान दिले. तोच शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः 378, इंग्लंड पहिला डाव ः 101.1 षटकात सर्वबाद 275 (रोरी बर्न्स 297 चेंडूत 16 चौकार, 1 षटकारासह 132, ओलि रॉबिन्सन 101 चेंडूत 5 चौकारांसह 42, जो रुट 113 चेंडूत 5 चौकारांसह 42. किवीज संघातर्फे टीम साऊदी 43 धावात 6 बळी, काईल जेमिसन 26 षटकात 3-85, नील वॅग्नर 1-83).