फ्लोरा डफीची ट्रायथलॉनमध्ये सुवर्ण कमाई, बर्म्युडाची लोकसंख्या अवघी 62,090!
फ्लोरा डफीने बर्म्युडासाठी नवा इतिहास रचला असून तिने ट्रायथ्लॉन इव्हेंट जिंकल्यानंतर बर्म्युडा हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा आतापर्यंतचा सर्वात छोटा देश ठरला आहे. लोकसंख्येच्या निकषावर हा विक्रम बर्म्युडाच्या खात्यावर नोंदवला गेला आहे.
अवघी 62090 इतकी लोकसंख्या असणाऱया बर्म्युडा देशात साऱयांच्या नजरा फ्लोरा डफीच्या इव्हेंटकडे लागून होत्या आणि तिनेही त्यांचा विश्वास पुरेपूर सार्थ करुन दाखवला. सुवर्ण जिंकताच ट्वीटवर तिच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव झाला. ‘आज अभिमान हा शब्द देखील तोकडा पडत आहे’, असे एका युजरने यावेळी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
फ्लोरा डफी ही 33 वर्षीय ट्राय-ऍथलिटला यावेळी प्रशिक्षक नव्हता, तसेच बाईक मेकॅनिकही नव्हता. पण, तरीही तिने जिद्दीने इव्हेंट पूर्ण करत सुवर्ण जणू खेचून आणले. यापूर्वी 2008 व 2012 ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली. मात्र, 2008 मध्ये तिला इव्हेंट पूर्ण करता आला नव्हता तर 2012 मध्ये बाईक क्रॅश झाल्यानंतर 45 व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. येथे मात्र सलग तिसऱया प्रयत्नात ती आणखी तयारीने उतरली आणि बर्म्युडाला तिने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले.
ट्रायथ्लॉन हा तीन टप्प्यातील खडतर इव्हेंट पार करण्यासाठी ऍथलिट अतिशय खंबीर असावा लागतो. 56 महिलांचा सहभाग असलेल्या या इव्हेंटमध्ये तिने 1 तास 55 मिनिटे 36 सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. ग्रेट ब्रिटनची जॉर्जिया टेलर-ब्राऊन रौप्य तर अमेरिकेची कॅटी झॅफर्स कांस्यपदकाची मानकरी ठरली. बर्म्युडाने आतापर्यंत भाग घेतलेल्या 27 सहभागात हे केवळ दुसरे पदक आहे तर पहिले सुवर्णपदक आहे.