उत्थित हस्त पादअंगुष्ठासन हे आसन करण्यासाठी जमिनीवरील आसनावर सरळ ताठ उभं राहा. नजर समोर ठेवा. पावलं एकमेकांना जुळलेली आणि पाठीचा कणा ताठ असावा.
- आता हळूहळू डावा पाय डोक्याच्या दिशेने उचला. डाव्या हातानं डाव्या पायाचा घोटा पकडा. तुमचे मांडीचे स्नायू बळकट असतील, तर डाव्या हाताचे लूप तयार करून डावी टाच किंवा अंगठा पकडा. मांडीचे पुढच्या बाजूचे स्नायू स्थिर करून बाहेरच्या बाजूचे स्नायू आतील बाजूस दाबून घ्या.
- आता श्वास घ्या. गुडघा सरळ करत डावा पाय जास्तीत जास्त वर खेचा. श्वास नियंत्रित करा. त्यामुळे मन एकाग्र होईल. तुमचा तोल उजव्या पायावर व्यवस्थित सांभाळला जाईल.
- ही आसनाची अंतिम स्थिती साधारपणे अर्था ते एक मिनिटापर्यंत स्थिर करा. नंतर पायाला झोका देत डावा पाय सरळ आतमध्ये आणा. श्वास सोडत डावा पाय खाली टेकवा.
- यानंतर हीच सर्व क्रिया उजवा पाय उचलून करा.
- या आसनामुळे घोटा आणि मांडीच्या स्नायूंना बळकटी येते. हे तोलासन असल्यानं शरीराला व्यायाम होतो. शरीराचे टोनिंग होते. मांडीच्या स्नायूंना उत्तम व्यायाम होतो. खांदे, हात आणि नितंबाचे स्नायू उघडले जातात.
- छातीचे स्नायू ताणले जाऊन श्वासन चांगले होते. पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो. पचन सुधारते. सर्व पेशींना प्राणवायूचा पुरवठा होतो. शरीरातील ऊर्जा वाढते. एकाग्रता वाढते आणि मन स्थिर होऊन मनस्वास्था मिळते. घोटय़ाची, पायाची, मांडीच्या स्नायूंची दुखापत असल्यास, उच्च रक्तदाब, कंबरेचे दुखणे असल्यास तसेच स्त्रियांनी मासिक पाळी सुरू असताना किंवा गर्भधारणा असल्यास हे आसन करू नये.