महामार्गावर पिंगुळी येथील घटना
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-गुढीपूर येथे एस. टी. बसची धडक बसून गंभीर जखमी झालेले बसुराज शंकर चव्हाण (50, मूळ रा. मुद्देबिहाळ, विजापूर- कर्नाटक, सध्या रा. पिंगुळी) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात 11 जानेवारीला दुपारी झाला. ‘बसू राठोड’ या नावाने ते कुडाळ शहर व परिसरात परिचित होते. कुडाळ येथे डंपर चालक म्हणून ते काम करायचे.
बसुराज चव्हाण पिंगुळी-गुढीपूर येथे कणकवलीहून सावंतवाडीकडे जाणाऱया एस. टी. बससमोर अचानक आडवे आले होते. एस. टी. बसचालकाने प्रसंगावधान राखून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तोपर्यंत बसची धडक त्यांना बसली व ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना 13 जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची खबर पिंगुळी-गुढीपूर येथील सलीम सादिक सय्यद यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.