प्रकरणाची चौकशी करून कामगारांना न्याय द्या
प्रतिनिधी / बेळगाव
बांधकाम कामगारांसाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात येत होते. मात्र, हे किट लोकप्रतिनिधींनी आपल्या ताब्यात घेऊन बांधकाम कामगारांना देण्याऐवजी आपल्याच कार्यकर्त्यांना दिले आहेत. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी बांधकाम कामगार आणि शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
बांधकाम कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयाकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येत होते. यामध्ये लोकप्रतिनिधींचा कोणताही संबंध नव्हता. मात्र उत्तरचे लोकप्रतिनिधी आणि इतर लोकप्रतिनिधींनीही हे किट आपल्या ताब्यात घेतले. कामगार कार्यालयातील अधिकाऱयांवर दबाव आणून हे किट आपल्याकडे घेतले. त्यानंतर ते बांधकाम कामगारांना देण्याऐवजी आपल्याच कार्यकर्त्यांना वितरित केले आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला. या प्रकारामुळे जे बांधकाम कामगार आहेत ते मात्र किटपासून वंचित आहेत. तेव्हा या प्रकरणाचा तपास करावा आणि बांधकाम कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी सिद्धगौडा मोदगी यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.