प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे परिसरात त्याचप्रमाणे होडर, असोल्डा, शेल्डे आदी परिसरांत कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे असोल्डा पंचायत मंडळाने पंचायत सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेऊन असोल्डा पंचायत परिसरात शुक्रवार 7 ते 14 पर्यंत स्वेच्छा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पंच सुशांत नाईक यांनी पत्रकारांना दिली.
आज राज्यात सर्वत्र संक्रमण वाढलेले आहे व असोल्डा पंचायत परिसरात बरेच बाधित सापडलेले आहेत. फैलाव वाढू नये यासाठी विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण केले आहे व राहिलेल्या ठिकाणी आजपर्यंत करण्यात येणार आहे. या संक्रमणाची साखळी तुटावी यासाठी लोकांनीही परिसरात लॉकडाऊन करावा असे सूचविले होते. त्यासाठी बुधवारी सरपंच लता राऊत देसाई, उपसरपंच, पंच व सचिव यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन लोकहितार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची, कडधान्ये, दूध, भाजीची दुकाने सकाळी 6 ते 10 पर्यंत खुली राहणार आहेत. त्यामुळे कोणीच काम नसताना परिसरात फिरू नये. पंचायत मंडळाने जो निर्णय घेतला आहे त्याला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंच नाईक यांनी केले आहे.