वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तंत्रज्ञान शिक्षणात कार्यरत असणाऱया बायजूने सिल्वरटेकसह इतर कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे भांडवलवृद्धीत वाढ दर्शवली आहे. या कंपनीत सिल्वरलेकसह टायगर ग्लोबल, जनरल अटलांटिक तसेच आउल वेंचर्स यांनी गुंतवणूक केली आहे. परंतु कंपनीने याबाबतचा तपशील सादर केलेला नाही. बायजूने जवळपास 3,672 कोटी रुपये जमा केले आहेत. बायजूचे सध्याचे मूल्य 10.8 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सध्याच्या संकटाच्या काळात आम्ही भाग्यशाली आहोत कारण या संकटातही सिल्वरटेकसह इतर कंपन्यांनी आमच्यावर विश्वास राखत गुंतवणूक केली आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या क्षेत्रात कंपनी बऱयापैकी कार्यरत असून मुलांना, पालकांनाही याअंतर्गत मदत होत आहे, असे बायजू कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रन यांनी म्हटले आहे. आतापर्यंत झाली नव्हती तेवढी ऑनलाईन शिक्षणासंदर्भातील जागृती तेजीने वाढल्याचा फायदा झाल्याचे पहावयास मिळत आहे. विद्यार्थी वर्गाला आपला अभ्यास पूर्ण करण्यास मोठी मदत होत असल्याचे म्हटले आहे.