पंचायतीला सर्वतोपरी सहकार्य करणार : आमदार क्लाफासियो डायस, प्रकल्पामुळे महसुलात भर पडणार
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता हाती घेतल्यास 7 वर्षे पूर्ण होत असल्याने व गोवा घटकराज्य दिनाचे औचित्य साधून बाळ्ळी पंचायत इमारतीच्या विस्तार प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाचे उद्घाटन मुरगाव पीडीएचे अध्यक्ष तथा कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांच्या हस्ते झाले. पंचायत इमारतीच्या विस्तार झालेल्या भागात दुसऱया मजल्यावर सुसज्ज पंचायत कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांना कार्यक्रम व इतर कामांकरिता पहिल्या व दुसऱया मजल्यावरील सभागृहाची जागा उपयोगात आणता येणार आहे. या विस्तारकामामुळे पंचायतीचा महसूल वाढविण्यास फार मोठी मदत होणार आहे.
मागील बरीच वर्षे बाळ्ळी पंचायतीची जुनी कौलारू इमारत वापराविना पडून राहिली होती. नंतर ठराव संमत करून पंचायतीने जुन्या पंचायतघराच्या विस्ताराचे काम हाती घेतले. या कामाची सुरुवात तत्कालीन सरपंच अलका पोतदार यांच्या कार्यकाळात झाली होती व तत्कालीन खासदार नरेंद्र सावईकर व आमदार राजन नाईक यांच्या हस्ते पायाभरणी झाली होती. हे काम आरडीए खात्याच्या अंतर्गत झाले असून एकूण बांधकामावर 23 लाख 34 हजार रु. खर्च करण्यात आले आहेत.
उद्घाटनप्रसंगी गिरदोली जिल्हा पंचायत सदस्या संजना वेळीप, बाळ्ळी सरपंच दिपाली फळदेसाई, उपसरपंच वंदना गावकर, पंच राजू गोसावी, अविनाश वेळीप, विष्णू नाईक व प्रज्ञा फळदेसाई, केपे आरडीए विभागाचे अनुप नाईक, पंचायतीचे सचिव सुरेंद देसाई व साहाय्यक कारकून प्रशाला गावकर यांची उपस्थिती होती.
पंचायत इमारतीचे विस्तारकाम जलदरीत्या केल्याबद्दल पंचायत मंडळाची आमदार डायस यांनी स्तुती केली. केंद्रात भाजप शासनाला 7 वर्षे पूर्ण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाप्रती उत्तुंग कार्य बजावल्याबद्दल त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. मोदी यांना उत्तरोतर कार्य पुढे नेण्यासाठी शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
कोविडसंबंधी अडचणी आल्यास संपर्क साधा : डायस
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योग्यरीत्या प्रशासन चालविले असून कोविड काळातही त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे डायस म्हणाले. मंत्री मायकल लोबो यांच्याही कार्याची त्यांनी प्रशंसा केली. कोविडसंबंधी अडचणी, समस्या आल्यास पंचायतीने आपणाशी संपर्क साधावा, अशी सूचना त्यांनी सरपंच व पंचांना केली. पंचायतीला सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. सरपंच फळदेसाई यांनी मुख्यमंत्री सावंत तसेच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आरडीए मंत्री लोबो आणि आमदार डायस यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
तत्पूर्वी आमदार डायस यांनी कुंकळ्ळीत पालिका सफाई कामगार तसेच वादळ काळात चोख कामगिरी बजावल्याबद्दल कुंकळ्dळी मतदारसंघातील गिरदोली, चांदर, गुडी-पारोडा, बाळ्ळी, आंबावली येथील वीज लाईनमनची प्रशंसा केली आणि त्यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हातमोजे वितरित केले.