नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते, माजी खासदार आणि बिहारचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद शहाबुद्दीन यांचे शनिवारी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. दुहेरी हत्याकांडप्रकरणी तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या शहाबुद्दीन यांना कोरोनाच्या संसर्गानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती तिहार कारागृह महानिरीक्षकांनी दिली. 2004 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात शहाबुद्दीन यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. आर्थिक व्यवहारातून दोन भावांची हत्या करण्यात आल्याची ही घटना होती. मोहम्मद शहाबुद्दीन यांचा बिहारमध्ये दबदबा होता. ते दोनवेळा आमदार आणि चारवेळा खासदार राहिलेले राजकीय नेते होते. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शहाबुद्दीन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.