वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहार क्रिकेट संघटनेने बीसीसीआयचा आदेश धुडकावून टी-20 लीग स्पर्धा आयोजित केली होती. आता या स्पर्धेत खेळणाऱया प्रथमश्रेणी आणि अ दर्जाच्या यादीतील क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बीसीसीआयची अधिकृत परवानगी नसतानाही बिहार क्रिकेट संघटनेने पाटणा येथे 20 ते 26 मार्च दरम्यान टी-20 लीग स्पर्धा खेळविली गेली. या स्पर्धेत पाच संघांचा समावेश होता. या स्पर्धेत दरभंगा डायमंड्स संघाने विजेतेपद मिळविले. ही स्पर्धा चालू असताना बीसीआयकडून एक लेखी पत्र बिहार क्रिकेट संघटनेला 23 मार्च रोजी पाठविण्यात आले हेते. सदर स्पर्धेला अधिकृत मान्यता नसल्याने ती त्वरित थांबवावी, असे या पत्रामध्ये सुचित केले होते. पण बिहार क्रिकेट संघटनेने बीसीसीआयचा हा आदेश धुडकावून सदर स्पर्धा पूर्ण केली. आता या स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रथमश्रेणी आणि अ यादीतील क्रिकेटपटूंना बीसीसीआयसमोर सुनावणीसाठी जावे लागेल. या वादग्रस्त प्रकरणामध्ये क्रिकेटपटूंची गोची झाली आहे. बीसीसीआयच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.