कुबेर चषक 11 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सीसीआय स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱया कुबेर चषक 11 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने विजया अकादमीचा 48 धावानी, नीना स्पोर्ट्सने रॉजर स्पोर्ट्सचा 7 गडय़ांनी, आनंद अकादमीने इडिफायचा 5 धावांनी तर सीसीआयने के. आर. शेट्टी संघाचा 148 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. आरूष पुत्रन (बीएससी), समर्थ चौगुले (नीना), अद्वैत चव्हाण (आनंद), श्रेया पोटे (सीसीआय) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 20 षटकात 4 बाद 131 धावा केल्या. आरूष पुत्रनने 65 तर लक्ष खतायतने 25 धावा केल्या. विजयातर्फे मयांकने 22 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया क्रिकेट अकादमीने 20 षटकात 4 बाद 84 धावाच केल्या. हमजा सराफने 21, अदितीने 13 धावा केल्या. बीएससीतर्फे अवनीशने 14 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात रॉजर संघाने 20 षटकात 8 बाद 110 धावा केल्या. जतीन दुर्गाईने 30, युवराजने 20 धावा केल्या. नीनातर्फे समर्थ चौगुलेने 9 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना संघाने 19 षटकात 3 बाद 113 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला. समर्थ चौगुलेने 38, फराजने 22 धावा केल्या.
तिसऱया सामन्यात आनंद अकादमीने 20 षटकात 4 बाद 116 धावा केल्या. ओ. एस. गडकरीने 28, अदिती चव्हाणने 18 धावा केल्या. इडीफायतर्फे वीराजूने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इडीफायने 20 षटकात 8 बाद 111 धावाच केल्या. रियान मुल्लाने 34, धनराज पी.ने 20 धावा केल्या. आनंदतर्फे अद्वैत चव्हाणने 34 धावात 2, अथर्व करडी, श्लोक, स्वराज जुवेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात सीसीआयतर्फे 20 षटकात 5 बाद 239 धावा केल्या. श्रेया पोटेने 24 चौकारासह 52 चेंडूत 121 धावा करून स्पर्धेतील पहिले शतक झळकाविले. तिला झोया काझीने 9 चौकारासह 58, कलश बेनिकट्टीने 4 चौकारासह 20 धावा करून चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव कोल्ट्सने 20 षटकात 6 बाद 91 धावाच केल्या. अनिराज पाटीलने 17, विश्रुतने 15 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयंने 2 तर कलशने 1 गडी बाद केला.