मेलबर्न / वृत्तसंस्था
मेलबर्न स्टार्स संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने बुधवारी बिग बॅश लीग (बीबीएल) स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. त्याने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध लढतीत अवघ्या 64 चेंडूत 154 धावांची आतषबाजी केली. त्याच्या या दीडशतकी खेळीत 22 चौकार व 4 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. मॅक्सवेलच्या या झंझावातामुळे मेलबर्न स्टार्स संघाने 20 षटकात 2 बाद 273 धावांचा डोंगर रचला. या स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्याही ठरली. मॅक्सवेलसाठी हा बीबीएल स्पर्धेतील 100 वा सामना होता.
स्टोईनिस व मॅक्सवेल यांनी मेलबर्न स्टार्स संघातर्फे तिसऱया गडय़ासाठी 132 धावांची भागीदारी साकारली. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया मार्कस स्टोईनिसने देखील अवघ्या 31 चेंडूत 75 धावांची आतषबाजी केली. त्याच्या खेळीत 4 चौकार व 6 षटकारांचा समावेश राहिला. पूर्ण डावात मेलबर्न स्टार्स संघाने 29 चौकार व 10 षटकार नोंदवले.