सध्या जणू विक्रम बनविण्याचेच दिवस आहेत असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात तब्बल आठ किलो वजनाचा एक प्रचंड सामोसा बनविण्यात आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने तो तयार करण्यात आला. त्यासाठी 3 स्वयंपाक्यांनी 5 तासांचे परिश्रम केले. मेरठ छावणीतील एका मिठाईच्या दुकानदाराने या सामोशाची निर्मिती केली असून त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच लोकप्रिय झालेला आहे. या यशामुळे भारुन गेलेया या दुकानदाराने आता 10 किलोचा सामोसा आणि 5 किलो वजनाची जिलेबी बनविण्याचा संकल्प सोडला आहे. कौशल स्वीट्स असे या दुकानाचे नाव आहे.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/hhhhhhhhhhhhhhhhhhh.jpg)
दुकानाच्या चालकाचे नाव उज्ज्वल असे असून त्याने या उपक्रमाची माहिती दिली. हा सामोसा तयार करण्यासाठी साडेतीन किलो मैदा, अडीच किलो बटाटे, दीड किलो मटार, अर्धा किलोहून अधिक पनीर, तसेच अर्धा किलोपेक्षा अधिक सुकामेवा (काजू, बेदाणे, टरबुजाच्या बिया इत्यादी) अशा पदार्थांचा उपयोग करण्यात आला. याशिवाय तिखट, मीठ, मसाले आणि तळण्यासाठी तेल तर लागलेच. तयार झाल्यानंतर त्वरित हा सामोसा 150 लोकांना वाटण्यात आला. तो तयार करण्यासाठी 1,200 रुपयांचा खर्चही करण्यात आला. एवढा मोठा सामोसा तयार करण्याचे कारण काय, या प्रश्नाचे उत्तर ‘हौसेला मोल नसते’ हेच आहे.
हा सामोसा बनविण्याच्या आधी चार किलो वजनाचा असाच सामोसा बनविण्यात आला होता. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आठ किलोचा सामोसा तयार करण्यात आला असून नंतर 10 किलोचाही बनविला जाणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. उत्तर भारतात जिलबी आणि सामोसा हे सकाळच्या न्याहारीचे पदार्थ असतात. त्यामुळे पाच किलोची जिलबीही येणार आहे.