अन्य पदकविजेत्यांनाही बक्षीस जाहीर, हॉकी संघाला 1.25 कोटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱया सर्व भारतीय क्रीडापटूंना बीसीसीआयने रोख बक्षीस देण्याचे जाहीर केले असून सुवर्णविजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला 1 कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.
शनिवारी नीरज चोप्राने भारताला ऍथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून देताना भालाफेकमध्ये जेतेपद पटकावले. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी प्रत्येकाला दिल्या जाणाऱया रकमेची घोषणा ट्विटरवरून केली. रौप्यविजेत्या मिराबाई चानू व रवि दहिया यांना प्रत्येकी 50 लाख रुपये दिले जाणार आहेत. मिराबाई चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य जिंकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले तर रवि दहिया हा कुस्तीमध्ये रौप्य जिंकणारा सुशील कुमारनंतरचा दुसरा मल्ल ठरला. मल्ल बजरंग पुनिया, महिला बॉक्सर लोवलिना बोर्गोहेन, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू या कांस्यविजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळणार आहेत. 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱया कांस्य विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये दिले जाणार असल्याचेही शाह यांनी त्यात सांगितले आहे.