चौघांना अटक : सीसीबी पोलिसांची कारवाई : 15 किलो हशीश जप्त
प्रतिनिधी /बेंगळूर
अमली पदार्थ विकणाऱया टोळीचा छडा लावत सीसीबी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून 6 कोटी रुपये किमतीचे 15 किलो हशीश, 11 किलो गांजा आणि एक्सटीसी गोळय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. नबरन चकमा (रा. आसाम), मोबिन बाबू (रा. आंध्रप्रदेश), रोलँड रोडनी रोजर (रा. बेंगळूर) आणि तरुणकुमार लालचंद (रा. चेन्नई) अशी अटक केलेल्या चौघा जणांची नावे आहेत.
बेंगळूरच्या हेण्णूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एलाईट अश्विनी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेली ही टोळीने मागील तीन वर्षांपासून पोलिसांना कोणताच सुगावा न लागू न देता शहरात हशीश ऑईलचा पुरवठा आणि विक्री करत होते.
याविषयी माहिती मिळताच सीसीबी पोलिसांनी शुक्रवारी सदर अपार्टमेंटवर छापा टाकून चौघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याजवळील 6 कोटी रुपये किमतीचे 15 किलो हशीश, 11 किलो गांजा, 530 ग्रॅम चरस, 4 हायड्रो गांजाची रोपे, मोबाईल, कार, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. बेंगळूर सीसीबी पोलिसांनी प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी बायाप्पनहळ्ळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे.
केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी बी. एस. अंगडी, एसीपी गौतम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस निरीक्षक अशोक, पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार आणि इतर सहकाऱयांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी या पथकाचे कौतुक करत 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.