बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगरपालिकेने (बीबीएमपी) अखेर शहरातील ३६ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या रुग्णालयांवर कोरोना रूग्णांना ५० टक्के बेड राखीव न ठेवण्याच्या व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन न केल्याचा आरोप आहे. बीबीएमपीने बजावलेल्या नोटीसमध्ये या रुग्णालयांना ४८ तासांत नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रुग्णालये या सूचनांचे पालन करत नसल्यास केपीएमई कायद्याच्या कलम १५ अंतर्गत त्यांची नोंदणी त्वरित रद्द केली जाईल. यामध्ये १०० पेक्षा जास्त बेड असलेली २१ रुग्णालये, ५०-१०० बेड असलेली १० रुग्णालये आणि २०-५० बेड असलेली ५ रुग्णालये असून यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. केपीएमई कायद्याच्या कलम १९ अन्वये आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार त्यांना दंड किंवा तुरूंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते असा इशारा हॉस्पिटल व्यवस्थापनास देण्यात आला आहे.
बीबीएमपी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शासनाने संदर्भित केलेल्या रूग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगून अनेक खासगी रुग्णालयांत दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे सरकारसाठी राखीव असलेले बेड खासगी रूग्णांना देण्यात आले आहेत.
बीबीएमपीने रुग्णालयांना कोरोना नसलेल्या रुग्णांच्या खाटांचा तपशील, शासनाने नमूद केलेल्या रूग्ण आणि खासगीरित्या दाखल केलेल्या रूग्णांची माहिती २ ४ तासांत देण्यास सांगितले आहे.