बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून राजधानीतही कोरोना रुग्ण वाढीचे स्तर सुरूच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत असून बेंगळूर शहर महानगर पालिकेचे महापौर गौतम कुमार यांनी मंगळवारी थर्मल टेस्टिंग व इतर प्रोटोकॉल व्यतिरिक्त सिटी मॉल्समध्ये येणाऱ्या नागरिकांची गंध चाचणी म्हणजेच स्मेल टेस्ट घेण्याचे सुचविले आहे.
बीबीएमपी कौन्सिलच्या बैठकीनंतर गौतम कुमार यांनी गंध तपासणीमुळे कोरोना संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल. “कोविड -१९ संसर्गग्रस्त लोक वास किंवा चव गमावून बसतात. जर एखाद्या व्यक्तीला वस्तूंचा वास येत नसेल तर त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाऊ नये”, असे महापौरांनी म्हंटले आहे.
महापौर कुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी मॉल्समध्ये गंध चाचणी करणे अनिवार्य केले जावे असे पत्रात म्हंटले आहे.