ट्रॅक्टर ट्रॉलीसह साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नागठाणे / प्रतिनिधी :
निनाम पाडळी, ता. सातारा येथे बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या दोघांवर वन विभागाने गुन्हे दाखल केले आहे. यांच्याकडून ट्रॅक्टर-ट्रॉली, दोन कटर मशीन, आणि तोडलेली वृक्षाची लाकडे असा एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, निनाम पाडळी, ता. सातारा गावच्या हद्दीत एका शेतामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती सातारा तालुका वन विभागाला प्राप्त झाली. माहितीच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण व त्यांचे सहकारी अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, सिंधु सानप, संतोष दळवी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी जांभळाची 5 वृक्ष 2 कटरच्या सहाय्याने तोडून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. नजीकच तोडलेली वृक्षाची लाकडे वाहतूक करण्यासाठी एक ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर-ट्रॉली, दोन कटर मशीन, आणि तोडलेली वृक्षाची लाकडे असा एकूण अंदाजे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी संपत दिनकर जाधव, रा.निनाम पाडळी, ता. सातारा आणि मंगेश रमेश भोसले, रा. डबेवाडी, ता. सातारा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.