वार्ताहर /हिंडलगा
बेनकनहळ्ळी ग्रा. पं. ने सरस्वतीनगर येथील रस्ता रुंदीकरणासाठी मनमानी कारभार करत खासगी इमारत व मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले होते. या विरोधात मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन सदर रुंदीकरणाला स्थगिती आदेश मिळविला असून रस्ता पुन्हा 30 फुटांचाच करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रा. पं. चा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला असून सदर प्रकरणात सामील असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत.
सरस्वतीनगर येथील रस्त्याचे 60 फूट रुंदीकरण करण्यासाठी मागील आठवडय़ात ग्रा. पं. ने घरमालकांना कोणतीच पूर्वकल्पना अथवा नोटीस न बजावता मनमानीपणे मोहिते यांची इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. यामध्ये मोहिते यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील बाजूस असलेल्या इतरही मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे पंचायतीच्या तुघलकी कारभाराविरोधात तक्रार करून संबंधित अधिकारी व काही सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. शिवाय धारवाड उच्च न्यायालयात धाव घेऊन सदर रस्ता रुंदीकरणाला स्थगिती मिळविली आहे. शिवाय नुकसानग्रस्तांनी न्यायालयात धाव घेऊन पंचायतीविरोधात नुकसानभरपाई मिळविण्यासाठी दावा ठोकण्याची हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे बळजबरीने खासगी मालमत्तेचे नुकसान करणे ग्रा. पं. च्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.