सरासरी 7.91 टक्के : शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.3 टक्क्यांवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या काळात देशात पुन्हा बेरोजगारी वाढू लागली आहे. डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.91 टक्के होता. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात 7.0 टक्के तर ऑगस्ट 2021 मध्ये 8.3 टक्के इतका दर नोंद झाला होता. विशेषतः शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरमध्ये तो 8.2 टक्के इतका होता. ग्रामीण बेरोजगारीचा दरही डिसेंबरमध्ये 7.3 टक्क्मयांवर पोहोचला असल्याचे थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार दिसून आले आहे. महिनाभर चाललेल्या या सर्वेक्षणात विविध शहरांतील 32 हजार 166 घरांतील 1 लाख 05 हजार 025 हून अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. यासंदर्भात मिळालेल्या निकालांवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
राज्यनिहाय बेरोजगारीच्या सर्वेक्षणानुसार हरियाणामध्ये डिसेंबरमध्ये 34.1 टक्के इतका सर्वाधिक बेरोजगारी दर आहे. त्यानंतर राजस्थान 27.1 टक्के, झारखंड 17.3 टक्के, बिहार 16 टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये 15 टक्के इतके प्रमाण राहिले. राजधानी दिल्लीमध्ये हा दर 9.8 टक्के होता. कोरोनाच्या विळख्यामुळे मागील मे महिन्यात बेरोजगारीचा दर 11.84 टक्के या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर त्यात घसरण दिसली आणि सप्टेंबरमध्ये तो 6.86 टक्क्मयांवर आला, पण आता पुन्हा वाढू लागला आहे.