होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरचे संचालक म्हणून नियुक्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
मूळचे बेळगावचे व सध्या मुंबई येथे टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कार्यरत असलेले डॉ. उमेश महांतशेट्टी यांची विशाखापट्टणमच्या होमी भाभा हॉस्पिटल अँड कॅन्सर रिसर्च सेंटरचे कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली आहे. सीमाभागातील एका तरुण डॉक्टराची अत्युच्च पदावर निवड होणे ही बेळगावकरांना आणि सीमावासियांना अभिमान वाटावा, अशीच बाब आहे.
डॉ. उमेश महांतशेट्टी हे मूळचे बेळगावचे. त्यांचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स येथे झाले. आरएलएसमध्ये आणि पुढे जेएनएमसीमधून त्यांनी एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली. त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून त्यांनी एमडी पदवी घेतली. याशिवाय त्यांनी रेडिओथेरपीमध्ये डीएनबी आणि डीएनआरटी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेथेच आपली सेवा सुरू केली.
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई ही आशियातील अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे. या संस्थेत डॉ. उमेश यांनी प्राध्यापक आणि सिनियर कन्सल्टंट म्हणून सेवा बजावली. स्त्रियांना होणारे कर्करोग हा त्यांचा खास विषय असून आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रात विपुल कार्य केले आहे. विकसित आणि विकसनशील देशांना उपयुक्त ठरतील अशा कर्करोगाच्या संशोधन प्रकल्पामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. इंडियन ब्रॅचीथेरपी सोसायटीची स्थापना करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. या संस्थेचे सचिवपदही त्यांनी भूषविले.
कर्करोगासंबंधीच्या अभ्यासाची दखल
आंतरराष्ट्रीय स्तरावरील जामा, लान्सेट, जेसिओ अशा विविध जर्नल्समध्ये त्यांचे 200 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातही त्यांचे लेख आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कर्करोग तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या संशोधनाची आणि कर्करोगासंबंधीच्या अभ्यासाची दखल घेऊन 1 एप्रिल 2020 रोजी होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर विशाखापट्टणम येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे. सदर हॉस्पिटल भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागाच्या कक्षेत कार्यरत आहे.
डॉ. उमेश महांतशेट्टी नार्वेकर गल्ली, बेळगाव येथील रहिवासी असून कै. मुरघेंद्र व फुलावती यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचे मोठे बंधू प्रवीण हे अभियंता असून दुसरे बंधू नितीन महांतशेट्टी हृदयरोगतज्ञ आहेत. सीमाभागातील एका तरुण डॉक्टराची होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटलच्या संचालकपदी झालेली निवड निश्चितच कौतुकास्पद आहे.