ट्रायथलॉन, डय़ुएथलॉन इव्हेंट रंगणार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावात प्रथमच सुपरबिईंग ट्रायथलॉन व डय़ुएथलॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, नोंदणीकृत 152 स्पर्धक त्यात भाग घेणार आहेत. 1 लाख 65 हजारची बक्षिसे देण्यात येणार असून, चार बाबी पुरूष व महिला गटात घेण्यात येणार असल्याची माहिती आयर्नमॅन डॉ. किरण खोत यानी पत्रकार परिषदेत दिली.
सुपरबिईंग ट्रायथलॉन व डय़ुएथलॉन स्पर्धेच्या आयोजनाबद्दल ते हॉटेल सन्मान येथे बोलत होते. रविवार दि. 27 मार्च रोजी थॉट फ्लो शिक्षण संस्था बेळगाव, पॅडलर्स क्लब व बेळगाव ऍक्वेटीक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बेळगावच्या किल्ला तलाव येथे स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी तीन आठवडे आधी नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑलिम्पिक डिस्टन्स व स्प्रिंट अशा पुरूष व महिला प्रत्येकी दोन गटात होणार आहे. ऑलिम्पिक डिस्टन्समध्ये 1.5 किमी पोहणे, 40 किमी सायकलिंग व 10 किमी धावणे, स्प्रिंटमध्ये 700 मी. धावणे, 20 किमी सायकलिंग व 10 किमी धावणे असे इव्हेंट होतील.
डय़ुएथलॉनमध्ये 5 किमी धावणे, 40 किमी सायकलिंग व 10 किमी धावणे. स्पिंटमध्ये 5 किमी धावणे, 20 किमी सायकलिंग व 5 किमी धावणे अशा विभागात ही स्पर्धा होणार आहे.
जलतरण स्पर्धा किल्ला तलावात होणार असून, रविवारी सकाळी 6.15 वा. प्रारंभ होणार आहे. जलतरण झाल्यानंतर 40 किमी सायकलिंग किल्ला तलावापासून प्रारंभ होऊन पुणे-बेंगळूर रोड, हिंडाल्को, काकती, होनगा औद्योगिक वसाहत, राणी चन्नम्मा विद्यापीठ मार्गे वंटमुरी येथून पुन्हा त्याच मार्गे किल्ला तलाव येथे सांगता होईल. धावण्याच्या स्पर्धेला किल्ला तलाव येथून प्रारंभ करून कणबर्गी रोड, ऑटोनगर मार्ग, केएससीए स्टेडियम येथून पुन्हा त्याच मार्गे किल्ला तलाव येथे सांगता होणार आहे. यामध्ये 18 ते 34 वयोगट इलाईट कॅटेगरी व 35 वर्षावरील मास्टर्स गटात होणार
आहे.
या स्पर्धकांना आयोजकांतर्फे सर्व सोयी सवलती देण्यात येणार असून ही स्पर्धा तरूण व शालेय विद्यार्थ्यांसाठी पुढील काळात उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी शालेय मुला-मुलींनी तसेच महाविद्यालयीन युवा-युवतीनी ही स्पर्धा पाहण्याचे आवाहन केले आहे. पुढील वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा भरविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत बेळगावच्या पहिल्या महिला आयर्नमॅन मयुरा शिवलकर, साई जाधव, गिरीश दंडण्णावर, इजाज इनामदार, अफरोज आपटेकर आदी उपस्थित होते.