होनगा, चन्नम्मानगर येथे सीईएन विभागाची कारवाई, तिघा जणांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
होनग्या जवळील एका धाब्यासमोर असलेले पान दुकान व राणी चन्नम्मानगर येथील एका घरावर छापा टाकून सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी अफीम जप्त केले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 20 लाख रुपयांइतकी होते. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आदी उपस्थित होते. अफीम जप्त करणाऱया पोलीस पथकाला आयुक्तांनी बक्षिसेही जाहीर केली आहेत.
सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. बरकतखान विल्लाखान (वय 30, जोगानट्टी), कमलेश सुरजनराम बेनीवाला (वय 25, रा. गोकुळ रोड, मुरारजीनगर, हुबळी), सरवन उर्फ सावराराम असुराम बिस्नोई (वय 25, रा. चन्नम्मानगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार होनगा जवळील राजस्थान धाबासमोर असलेल्या पान दुकानात अफीमची विक्री केली जात होती.
याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून आफीम जप्त करण्यात आले. पान दुकान चालविणाऱया बरकतखानला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार कमलेश व सरवनला अटक करण्यात आली.
पोलिसांनी या त्रिकुटाकडून 1 किलो 15 ग्रॅम इतका आफीमचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 20 लाख रुपयांइतकी होते. राजस्थान धाब्यासमोरील पान दुकानात केव्हापासून आफीमची विक्री केली जात होती याची चौकशी करण्यात येत आहे. हा साठा राजस्थानमधून मागविण्यात येत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एल. एस. गोरले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एल. देशनूर, विजय बडवण्णावर, दीपक माळगी, मारुती कोन्नागोळ, रमेश अक्की, निंगाप्पा मादार, बसवराज बस्तवाड, आर. एस. नाईकवाडी, राजू चरलिंगमठ, चुळचाप्पा दासर आदींनी भाग घेतला होता. पोलीस आयुक्तांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
पाळेमुळे खणण्याची गरज
शुक्रवारी सीईएन विभागाने अटक केलेला बरकतखान हा राजस्थान धाब्यासमोर पान दुकान चालवितो. हुबळी येथील कमलेश व राणी चन्नम्मानगर येथील सरवन हे दोघे फॅब्रीकेशनचे काम करतात. या त्रिकुटाला अफीम पुरविणारा म्होरक्मया कोण आहे? याचाही तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी या टोळीची पाळेमुळे खणण्याची गरज आहे.